कोरोंनाच्या लॉकडाउन मध्ये २०२० साल वाहून गेले. २०२१ साल उजाडले. कीहीमला जाण्याचे ठरवले आणि २९ जानेवारीला पॅराडिसो बे मध्ये कीहीमला आलो. भाऊकाका आणि वीणाआत्यालाही तिथे येण्याचे निमंत्रण दिले. ते ही यायला तयार झाले. ३० जानेवारीला पॅराडिसो बे मध्ये त्याचे आगमन झाले. आणि पॅराडिसो बे च्या घरी जणू वृध्दाश्रमच सुरू झाला. कारण सर्वजण (आई – ८७ वर्षे, भाऊकाका – ८० वर्षे, वीणा आत्या ७० वर्षे, मी – ६५ वर्षे आणि स्मिता – ६३ वर्षे) वय वर्षे ६० पेक्षा अधिक होते. एक आठवडयाचे त्यांचे इथले वास्तव्य. दोघांनाही घर, सोसायटीचा परिसर आवडला. परत मुंबईला गेल्यावर वीणा आत्याने तर कवितेतून कौतुक केले. असे …
तुमच्या पवित्र वास्तूत
मन भारावले सुध्दां
तुमच्या प्रेमाची ही उब
अनुभवावी, परत एकदां
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मानूनी आभार तुमचे,
कां बरं, साधावा दुरावा?
तुमच्या मायेचा ओलावा
मला, जीवनभर लाभावा
स्मिता, प्रदीप तुमचे प्रेम
पाहून, आले मन गहिवरून
तुमच्या प्रेमळ आदर
तिथ्याने आम्ही गेलो भारावून
तुमच्या घराची साक्षात्
असे लक्ष्मी, माझी स्मिता
तिने दिलेल्या प्रेमात,
नाही कसली कमतरता
… वीणा आत्या
वीणा आत्याने केलेल्या कौतुकाचा मी केलेला स्वीकार. असा …
दुराव्यातून प्रेम सांधतो
नात्यानात्यांचे सेतू बांधतो
परी सेतुवरी रहदारी नाही
गेले दूरदेशी विसरले सर्वकाही
परी उभा मी सिग्नल सारखा
नाक्यावरील जागता गुरखा
सर्व वडीलक्यांचा मी सखा
नाही होणार कोणी पारखा
वास्तू ही जणू वृद्धाश्रम
केव्हाही या विसरण्या श्रम
प्राशन करा शांतीची रम
मस्त रहा चिंता-कम
वडीलकीच्या नात्याचा तव आधार
वास्तव्याने तुमच्या पावन घर
हप्त्याभराचा आनंद सोहोळा
जणू जीवनातला मधुर मेळा
ती लक्ष्मी मी नारायण
नका करू त्याचे पारायण
जपू नाते जमवू आनंदक्षण
तृप्त जीवन सुखी मन
… प्रदीप
Leave a Reply