जेहेत्ते काळाचे ठायी …

जेहेत्ते काळाचे ठायी अखेर आमच्या हृदयनाथांनी कुबड्यांचा आधार घेतलाच …

काही महिन्यापूर्वीच ‘मी क्षीण होतोय’ अशी आर्त हाक हृदयनाथांनी आम्हाला दिली. सन २०१० ची पुनरावृत्ती होते आहे असे मनोमन आम्हाला जाणवले. ‘घरकी मुर्गी दाल बराबर’ अशी उक्ती असली तरी ‘घरची लक्ष्मी हेच सर्वकाही’ असे आम्ही मानतो. म्हणूनच गेली ५० वर्षे परीचारिका म्हणून रूग्णांच्या सेवेत असलेल्या भार्येला सगळे सांगून टाकले. तिने वेगाने हालचाली करून कोकिलबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले आमचे जावई राहुल यांचा सल्ला घेतला. त्यांनी त्याच हॉस्पिटलमधील डॉ. प्रशांत नायर यांचा सल्ला घ्यावा असा सल्ला दिला.

आमचे हृदय आम्ही डॉ. नायर यांच्या स्वाधीन केले. ‘हृदय दिले मी तुला” असल्या फालतू कवी कल्पनांना तिथेच तडा गेला. डॉ. नायरनी हृदयाच्या सभोवताली असलेल्या सर्व वाहिन्यांचे सर्वेक्षण करून, अतिक्रमणामुळे कुठे वाहिनी अरुंद झाली आहे आणि कोणत्या जंक्शनवर रक्तकणांचे ट्रॅफिक जॅम झाले आहे याचा आलेखच टक्केवारीसह सादर केला. ९५℅, ८५℅, ८०℅, ५०℅ आणि ३०℅ अशा पाच जंक्शनवर रक्तकणांचे ट्रॅफिक प्रवाही नव्हते. परिणामी आमचे हृदयनाथ क्षीण होत आर्त करू लागले. या क्षीण हृदयनाथांना कोणत्या डॉक्टरकडे सांभाळायला द्यावे याचा विचार करण्यातच दोन दिवस गेले. शेवटी अंबानी कुटुंबातीलच एका सदस्याच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजेच सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये आमच्या हृदयनाथांना पाठवायचे ठरले.

सर हरकीसनदास नरोत्तमदास हॉस्पिटल म्हणजे आमचे माहेर-सासर सर्वकाही. आमची आयुष्यातील पहिली नोकरी इथेच सुरू झाली. तरुण वयातील अनेक गमती-जमती आम्ही इथेच अनुभवल्या. त्यादृष्टीने सर हरकीसनदास नरोत्तमदास हॉस्पिटल म्हणजे आमचे माहेरचं. आणि इथलीच मुलगी पटवली आणि हॉस्पिटलच्याच मेट्रनने तिचे कन्यादान केले म्हणजे सासरही हेच. सहा वर्षांच्या नोकरीच्या काळात अनेकींना हृदय दिले-घेतले. पण याच हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडे आमचे हृदय स्वाधीन करावे लागेल असे वाटले नव्हते.

आमचे जावई – राहुलनीच पुन्हा सल्ला दिला. डॉ. अन्वय मुळेंच्या स्वाधीन करा हृदयनाथांना. क्षीण हृदयनाथांना पुढील आयुष्यातील अनेक सुंदर क्षणांचा आस्वाद घेण्यासाठी डॉ. मुळेंकडे सुपूर्द केले. त्यांनी त्यांची करामत केली. जंक्शनचा अडथळा त्यांनी नितीन गडकरींसारखा दूर केला. गडकरींनी फ्लायओव्हर बांधले आणि डॉ. मुळेंनी हाताच्या वाहिनी कापून ५ जंक्शनवर बायपास तयार केले. बायपासच्या कुबड्याच त्या. रक्तकणांची वहातुक प्रवाही झाली. हृदयनाथांना टॉनिक मिळाले. पण सर्वकाही एवढे सोपे नव्हते. २०१० साली मधुमेहानीही सर्वांग मधुर केले होते. २०२० पर्यंत त्याची वृद्धीही जोरात होती. ब्लड प्रेशरचाही प्रोब्लेम समोर उभा होता. थोडक्यात भार्येनी आम्हाला defective piece ठरवले आहे.

OT मधून आमची रवानगी ICU मध्ये झाली. ICU च्या कक्षात आम्ही एकटेच. सोबत फक्त call bell, एका girl ला बोलवायला. अर्थात तिला सिस्टर म्हणायचे. कधी कधी ब्रदरही यायचा. त्याला सहन करायला लागायचे. ICU चा उंबरठा ओलांडून आता वॉर्डमध्ये आलो आहे. आजचा चौथा दिवस. Back to Pavillion आता जायचे नाही. अनेक सुंदर आणि मोहमयी क्षणांचा अनुभव घेतला. आता सुंदर निरोगी क्षणांना सामोरे जायचे आहे.

… प्रदीप
०८ नोव्हेंबर २०२०

In

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *