डॉ. रमेश आचरेकर – प्रयोग मालाडचा भक्कम आधार …
रात्रीचा दीड वाजला होता. आम्ही मामांच्या घराची बेल वाजवली. मामांनी दरवाजा उघडला आणि आम्ही १५-२० जण जल्लोष करीत त्यांच्या घरात घुसलो. मामी त्यांच्या मागेच उभ्या होत्या. मामांनी प्रश्नार्थक नजरेने विचारले ‘काय रे, काय झाले?’. दिलीपने उत्साहीत होऊन सांगितले, ‘मामा, प्रबोधन एकांकिका स्पर्धेत आपल्याला तिसरे बक्षीस मिळाले.’ मामींनी आम्हा सर्वांचे स्वागत केले. एवढ्या रात्रीसुद्धा त्यांनी आमच्या विजयाबद्दल हातावर साखर ठेवली. चहाचा आग्रह केला. आम्ही सर्वांनी हक्काने हो म्हटले.
दिलीपने ‘आपल्याला बक्षीस मिळाले’ असे म्हटले. कारण, मामा म्हणजेच डॉ. रमेश आचरेकर म्हणजेच प्रयोग मालाड आणि प्रयोग मालाडचे आम्ही सर्व कलाकार – कार्यकर्ते म्हणजे त्यांचे अनुयायी, असं समीकरणच होतं. अर्थातच मामीही या समीकरणाचाच भाग होत्या.
प्रयोग मालाडची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच वर्षी म्हणजे १९७९ ला प्रबोधन एकांकिका स्पर्धेत आम्ही सपाटून आपटलो. मामा प्रयोग मालाडचे अध्यक्ष. त्यांनी कानउघाडणी केली, सर्व प्रकारचे प्रोत्साहन दिले आणि पुढल्याच वर्षी आम्ही त्याच स्पर्धेत तिसरे बक्षीस पटकावले. त्यानंतर अनेक एकांकिका स्पर्धा आणि राज्य नाट्य स्पर्धेत आम्ही बक्षिसे पटकावली. बक्षिस पटकावले की पुन्हा-पुन्हा तेच घडत होतं. रात्री मामांची बेल वाजवायची, मामा-मामी स्वागत करायचे आणि मामी हातावर साखर ठेवायच्या. प्रत्येकवेळी त्यांनी तेवढ्याच आनंदाने आम्हाला प्रोत्साहित केले. प्रत्येकवेळी हातावर साखर ठेवायला मामी होत्याच हक्काच्या, पण मामांच्या अनुपस्थित काही लागले तर आम्ही हक्काने मामींकडे जायचो. प्रयोगचे कार्यालय बांधून होईपर्यंत त्यांच्या दवाखान्यातील उपलब्ध वेळेत आमच्या एकांकिकांच्या तालमी व्हायच्या.
प्रयोग मालाडच्या सेवाशाखेतर्फे अनेक रक्तदान शिबिरे, वैद्यकीय चिकित्सा शिबिरे आयोजित केली. अगदी जव्हार-मोखाडा सारख्या आदिवासी पाड्यातही वैद्यकीय चिकित्सा शिबिरे आम्ही आयोजित केली. मामांच्या एका फोनवर डॉक्टरांची पूर्ण टीम मोबाईल एक्स-रे मशिनसह या शिबिरात सामील झाली. मामांच्याच मार्गदर्शनाखाली प्रयोग मालाडच्या कार्यालयात आयोजित केलेल्या या शिबिरांचा लाभ अनेक गरजूंनी घेतला. मुद्रा उपचार पद्धती केंद्र, त्वचा चिकित्सा व उपचार केंद्र इत्यादी उपक्रम मामांच्या मार्गदर्शनानेच प्रयोग मालाडच्या कार्यालयात सुरु झाले.
प्रयोग मालाडच्या कलाशाखेतर्फे होणारी रंगावली स्पर्धा असो, फोटोग्राफी स्पर्धा असो, क्रीडाशाखेतर्फे होणारी मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेट स्पर्धा असो, खो-खो स्पर्धा असो की आंतरराज्य मल्ल्लखांब स्पर्धा अथवा शिबीर असो, ज्ञानशाखेतर्फे आयोजित केलेली आंतरशालेय बुद्धीचाचणी स्पर्धा असो की त्याकाळातील एस.एस.सी. व्याख्यानमाला असो, अलीकडच्या काळातील लघुनाट्य स्पर्धा असो की एकांकिका अभिवाचन स्पर्धा असो की एकांकिका लेखन स्पर्धा असो की ‘लेखक एक नाट्यछटा अनेक’ ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा असो की आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला ‘फिल्मिन्गो’ सारखा लघुपट महोत्सव असो, मामांचे आशिर्वाद आणि मार्गदर्शन असायचेच. प्रत्येक कार्यक्रमाला मामांच्या नुसत्या उपस्थितीनेच वातावरण भारून जायचे. आम्ही कार्यकर्ते दुप्पट उत्साहाने काम करायचो आणि कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न व्हायचा. कित्येकदा प्रयोग मालाडला त्यांनी आर्थिक मदतही केली आहे.
मामांचा लोकसंग्रह खूप मोठा होता. रामनगर, रांजणपाडा, विठ्ठलपाडा, भंडारवाडा, कुंभारवाडा या विभागाने बनलेल्या मालाडच्या चिंचवली गावात पूर्वी कोणतीच वैद्यकीय सुविधा नव्हती. मामांनी प्रसंगी रुग्णांना विनामुल्य वैद्यकीय सेवा दिली. चिंचवली गावातील आणि मढ-मार्वे येथील प्रत्येक रुग्णच नव्हे तर इतर कोणीही-केव्हाही त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी गेल्यास प्रेमळ खरडपट्टीसह योग्य मार्गदर्शन मिळेल याची खात्री होती. गणेशवाडीतील बैठ्या चाळीतील त्यांचा दवाखाना नेहमीच रुग्ण-मित्रांनी भरलेला असायचा. होय, मी रुग्ण-मित्र म्हणालो. कारण प्रत्येक रुग्ण मामांचा मित्रच असायचा. मित्रत्वाच्या भावनेने अनेकजण त्यांच्यासमोर आपापल्या वैयक्तिक समस्या अगदी सहजच मोकळेपणाने मांडायचे. मामाही तितक्याच आपलेपणाने त्यावर आपली मतं मांडून उपाय सुचवायचे.
परवा २९/०५/२०२० ला रात्री १०.३० ला अजितने फोनवर बातमी सांगितली. मामा गेले. पाठोपाठ अनेक मित्रांचे फोन-whatsapp संदेश आले. मामा गेले. १९३९ ला सुरु झालेले एक पर्व संपले. एक सेवाभावी डॉक्टर ही प्रतिमा निर्माण करणारे कित्येकांचे डॉक्टरमामा गेले. सल्लागार गेले.
प्रयोग मालाडचे पहिले अध्यक्ष आणि भक्कम आधारस्तंभ डॉ. रमेश आचरेकर … कै. डॉ. रमेश आचरेकर झाले.
भावपूर्ण आदरांजली …
… प्रदीप देवरुखकर
३१/०५/२०२०
Leave a Reply