सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवातील समारंभात मी रचलेल्या कवितेतील शेवटच्या दोन ओळी अशा होत्या …
आज आत्ता समोर आहेत, सोसायटीचे मूळपुरुष ।
खरोखर यांच्याचमुळे आज, आमची पिढी आहे खूष ।।
या मूळपुरुषांपैकी एक तारा आज निखळला.
गजानन वामन फडके, सोसायटीचे मूळपुरुष. खरोखरच फडकेकाका सोसायटीचे मूळपुरुष होते. याचे कारण म्हणजे फडकेकाकांच्या घरात ओट्याखाली सोसायटीच्या वास्तुपुरुषाच्या प्रतिमेची स्थापना केलेली आहे. सोसायटीच्या वास्तुशांतीच्या दिवशी श्री. व सौ. फडके यांनी श्री सत्यनारायणाची पूजा केली होती. येरकुंटवार काकूंनी “माझ्या मधुर सोसायटीच्या मधुर आठवणी” मध्ये ही आठवण लिहिली आहे.
सोसायटीच्या उत्कर्षासाठी फडकेकाकांनी केलेले प्रयत्न वादातीत आहेत. सोसायटीच्या कार्यकारी समितीत काका खूप वर्ष कार्यरत होते. काही वर्षे कार्यकारी समितीचे अध्यक्षही होते. त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे त्यांच्याबद्दल सर्वांच्याच मनात एक प्रकारची आदरयुक्त भीती होती. सदासर्वदा मधुर सोसायटीच्या उत्कर्षाचाच विचार त्यांच्या मनात असे. सोसायटीच्या व्यायामशाळेच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या समारंभात त्यांचा उत्साही सहभाग सर्वांच्याच लक्षात आहे. फडकेकाकूंच्या स्मरणार्थ त्यांनी सोसायटीला देणगीही दिली आहे.
“माझ्या मधुर सोसायटीच्या मधुर आठवणी” या फडकेकाकांच्या आठवणीतील शेवटचे वाक्य आहे …
“सोसायटीची अशीच प्रगती होत राहो व सगळ्यांनी गुण्यागोविंदाने एकत्र रहावे, हीच अपेक्षा.”
वार्धक्यामुळे काही काळाने कार्यकारी समितीवरून काका दूर झाले. तरीही रोज संध्याकाळी सोसायटीच्या मुख्य रस्त्यावर हळुवारपणे होणाऱ्या त्यांच्या फेऱ्या विसरता येणार नाहीत. सोसायटीच्या सायंकाळ-कट्ट्यावर न चुकता ते उपस्थित असत. तिथे समकालीन सदस्यांबरोबर त्यांचा आपुलकीचा संवादही चाले.
आज सकाळी बातमी आली. काका गेले. आणि या सोसायटीत रहायला आल्यापासूनचा काकांबरोबरचा प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला.
सोसायटीच्या एका मूळपुरुषाचे महानिर्वाण झाले. सद्य परिस्थिती त्यांच्या महानिर्वाण यात्रेला उपस्थित रहाता आले नाही यांची खंत आहे.
भावपूर्ण आदरांजली
… प्रदीप देवरुखकर
०४/०६/२०२०
Leave a Reply