आज मस्त गेम खेळलो.
सरकत्या जिन्यावरून उलटा खाली उतरलो.
अंधेरीला दोन नंबर प्लॅटफॉर्मवर उभा होतो. २ नंबरच्या इंडिकेटरवर ९.३७ ची “पनवेल” लागली होती.
एवढ्यात ते बदलून १ नंबर प्लॅटफॉर्मच्या इंडिकेटरवर “पनवेल” लागली. मग काय? पळापळ …
मी धावत धावत सरकत्या जिन्याकडे पोहोचलो. चढलो. वर जाऊ लागलो. आणि अचानक …
सर्व गर्दी उलटी फिरली. सरकत्या जिन्यावरून खाली येऊ लागली. जिना वर सरकतच होता. मी वळून पाहिलं तर १ नंबरवरून परत २ नंबरला “पनवेल” लागली. मला काहीच सुचेना. गर्दीबरोबर आपोआप मी ही जिन्यावरून उलटा खाली येऊ लागलो. जिना वर सरकतच होता.
मी हळू हळू खाली येत होतो. शेवटच्या पायरीजवळ आलो. खरं तर वर जाण्याची ती पहिली पायरी होती. प्रत्येक क्षणी खाली येताना मी नकळत वरच जात होतो.
आणि …
एकदाचा जोर लावून शेवटच्या (पहिल्या) पायरीवर आलो. आता फक्त एक पाऊल टाकून बाहेर पडायचे. पण …
तेच जमत नव्हतं. मी पुन्हा पुन्हा मागेच (वर) जात होतो.
मागून पब्लिक ओरडत होतं …
काका थांबू नका.
अरे पनवेल आली. लवकर उतरा.
काका बाजूला हात पकडू नका.
म्हातारा इथे कुठे तडमडला?
तेवढ्यात ……
एक मुलगी बाजूला आली. तिने मला अक्षरशः आपल्या अंगावर ओढले आणि क्षणार्धात आम्ही दोघेही जिन्यावरून बाहेर सटकलो.
मी क्षणभर गांगरलो. सावरलो. आणि त्या मुलीचे आभार मानायला आजूबाजूला पाहू लागलो. पण ती होती कुठे? ती केव्हाच “पनवेल” पकडायला पळाली होती.
वयाच्या साठी नंतर सरकत्या जिन्यावरून अनेक वेळा गेलो. पण रेल्वेच्या कृपेने (चूकीमुळे) सरकत्या जिन्यावरून प्रथमच उलटा प्रवास अनुभवला.
Leave a Reply