प्रयोग मालाड निर्मित आणि प्रदीप राणे लिखित ‘अनजान शहर’ चा प्रयोग राज्य नाट्य स्पर्धा – २०१८ – दिनांक ३० जून २०१८ ला सादर झाला. आणि प्रयोगानंतर उत्कृष्ठ सादरीकरणासाठी सर्व कलाकारांचे अभिनंदन करताना केलेले त्यांचे कौतुक …
प्रिय रंगकर्मींनो,
कालच्या लढाईत प्रत्येक सैनिकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. “जिंकु किंवा मरू” चा मंत्र विसरुन “आम्ही फक्त जिंकुच” च्या नव्या मंत्राने प्रत्येकजण भारावून गेला होता. प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी प्रत्येकजण सेनापतीच्या आवेषानेच लढत होता. सेनापती उन्मेष वीरकरांनी केलेली रंगांची उधळण पाहूनच शत्रूसैन्याची धुळधाण उडाली. प्रतिस्पर्धी देशातील अतिरथी महारथी आणि ज्यांच्या नुसत्या उपस्थितीनेच सैनिकाला स्फुरण चढते असे अनेक दिग्गज, आपल्या सैनिकांचा रणभूमीवरील आविष्कार पहाण्यासाठी जमा झाले होते. ज्यांच्या नावाचा झेंडा मिरवत आपली सेना लढाईला उतरली होती ते ऋषीतुल्य राणेसरही रणांगणावर चौफेर नजर ठेवून होते. द्रोणाचार्य गाडगीळ सरांनी रणशिंगे फुंकुन सैनिकांच्या मनात आत्मविश्वास ठासून भरला होता. रणवाद्ये योग्य क्षणी वाजवून सैनिकांच्या मनात अभिनयाचा त्वेषाग्नी चेतवण्याचे महत्वाचे काम संदीपने नेटाने केले. रणभूमीवर खंदक आणि उंचसखल व्युहरचना करण्यासाठी प्रदीप पाटीलांचे सहकार्यही अनमोल ठरले. महाभारताच्या लढाईतील आॅंखोदेखा हाल संजयने आपल्या दिव्यदृष्टीने धृतराष्ट्राला ऐकविला होता. पण काल रणभूमीवर उपस्थित राहू न शकल्यामुळे राजु चावला सरांनी आॅंखोदेखा हाल विचारण्यासाठी मलाच “संजय” बनवले. मीही उत्साहाने प्रयोग मालाडच्या सैन्याने लढलेल्या कालच्या लढाईचा आॅंखोदेखा हाल त्यांना असा काही कथन केला की जणूकाही मीच या लढाईतील एक योद्धा होतो.
कालच्या लढाईचे परिक्षण करुन विजेता ठरविण्यासाठी साहीत्य संघाच्या रणभूमीवर अवतरलेला प्रत्येक चित्रगुप्त मंत्रमुग्ध झाला असेल असा विश्वास आहेच.
पण त्यापूर्वी आपल्या सैन्यातील प्रत्येक लढवैय्याचे कौतुक करण्याचे कर्तव्य “प्रयोग मालाड” ला पार पाडावेच लागेल. आणि म्हणूनच आज (०१ जुलै २०१८) संध्याकाळी बरोब्बर साडेसात वाजता प्रत्येक सैनिकाने मधुर सोसायटीतल्या आपल्या कर्मभूमीवर अगत्याने येण्यासाठी हे निमंत्रण.
… प्रदीप देवरुखकर
प्रतिक्रिया …
उत्तम ! खबरबात समजली, मनास हर्ष जाहला. तेथे नसल्याचा सल दूर पळोनी गेला. कार्य सुरळीत नव्हे, तर मनी भरेल यासाठी केलेला परिश्रम कामास येईल अथवा देवास अर्पण होईल हे काळच ठरविलं पण लढण्याच्या पराक्रमास कमी न पडल्याची भावना परिवारास उत्तेजन देती जाहली हेही नसे थोडके!!
सांगायचे राहून गेले, धुतराष्ट्र राजूI चावलास धन्यवाद, त्यांनी इच्छा प्रकट केली म्हणून हे वर्तमान आम्हास कळलें
👆सुदेश म्हात्रे … सचिव, प्रयोग मालाड.
हे असं अलंक्रुत कौतुक करणे ही तुमची खासियतच आहे. मला वाटतेंय कि हे सर्व शांतपणे लिहिण्यासाठीच तुम्ही टेंपोमधून गेलात. असं कौतुक करून एखाद्या कलाकाराकडून चांगले काम कसं करून घ्यायचं हे खरं तुमच्याकडून शिकायला हवे. या पोस्ट मधेही तुम्ही आम्हा सर्व कलाकारांना अशा उंचीवर नेऊन ठेवलं आहे कि विचारू नका….
तुम्हीं, उदयदादा, अजितदादा, भूषणदादा, संजूदादा आणि दिलीपदादा या कर्णासहित पांडवांकडून मिळणारं प्रोत्साहन आणि मदतच आम्हाला पुढे नेत आहेत.
द्रोणाचार्य गाडगिळ सर आणि सुदर्शनधारी राजूभाई यांचं मार्गदर्शन असंच मिळत राहिले तर प्रयोगचं ‘पंचायन’ व्हायला खुप वर्ष वाट पहावी लागणार नाही…
….. सर्व पांडव सैन्याचे मनोबल वाढवण्याबद्द्ल आम्ही सर्व कलाकार आपल्या सर्वांचे खुप खुप आभारी आहोत.
संदीप भागवत…
Leave a Reply