लाला लजपत राय कॉलेजचा “आधारवड” …

दिनांक ५ ऑगस्ट २०२०. रात्री ९.३० वाजता समीर भोसलेंनी एक व्हिडीओ पाठवला. त्याच्यासोबत संदेश होता …

“लाला लजपत राय कॉलेज समोरचं वडाचं झाड पडलं.”

कॉलेजच्या जन्मापासून गेटवरच दिमाखात उभे असलेले ते वडाचं झाड उन्मळून पडलेलं व्हिडीओमध्ये दिसत होत… चिरकाल निद्रा घेत असत असलेलं, आपल्या विस्तीर्ण फांद्या आणि जमिनीत रुजलेल्या मजबूत पारंब्या दिमाखाने मिरवत, आपल्या पानांचा पिसारा फुलवलेलं… पण आता शांत झालेलं.

कॉलेजात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे, विद्यार्थ्याचे, त्याच्या पालकांचे प्रथम स्वागत करण्याचा मान या वडाने हक्काने आपल्याकडे राखून ठेवला होता. गेटच्या बाहेरच तो वड आपली ड्युटी इमानेइतबारे इतकी वर्ष करत होता. कॉलेजच्या इमारतीची प्रत्येक वीट त्याच्या ओळखीची होती. जणू त्या प्रत्येक विटेचे पालकत्व त्या वडाने आपणहून स्वीकारले होते. त्या प्रत्येक विटेवर त्या वडाने आपले संस्कार केले होते. असंख्य विद्यार्थ्यांची, कर्मचार्यांची जबाबदारी आपलीच आहे, याची जाणीव याच वडाने प्रत्येक विटेला करून दिली होती. त्या सर्व विटांनीही या वडाची आज्ञा शिरसावंद्य मानून लाला लजपत राय कॉलेजची ही इमारत आपल्या खांद्यावर आज समर्थपणे तोलून धरली आहे.

आपल्या पानांच्या विस्तीर्ण पिसाऱ्याखाली चालणारी विद्यार्थ्यांची मौजमजा, लेक्चर टाळून हळूच कॉलेजमधून पसार होणारी विद्यार्थ्यांची टोळकी, थोड्याच अंतरावरील राजूच्या स्टॉलवर सँडविच खाणारे खादाड खवय्ये, वेडीवाकडी पार्क केलेली वाहने, समोरचे विराण-निष्पर्ण उद्यान, त्या उद्यानात बसलेली विद्यार्थ्यांची घोळकी या वडाने पाहिली आहेत. स्वत:च्या शीतल छायेत फुलणारी अनेक प्रेम प्रकरणेही त्याने कौतुकाने न्याहाळली आहेत. अनेक चिमण्या- कावळे आणि इतर पक्षी आपल्या अंगाखांद्यावर खेळवली आहेत.

सभोवतालची शिस्तप्रिय सरकारी वसाहत, बाजूलाच असलेली up-to-date “सौदामिनी”, सौदामिनीच्या नजीकची कष्टक-यांची दाटीवाटीने-एकमेकांच्या सहाय्याने उभी असलेली घरे, दिव्यांगाची वर्दळ असलेली आणि त्यांच्या अखंड सेवेत असलेली हॉस्पिटलची इमारत वर्षोनुवर्षे या वडाचे मित्र होते.

या सर्वांच्या सानिध्यात या वडाचे सर्व काही मजेत चाललं होतं. हा वड जणू काही या कॉलेजचा, यातील विद्यार्थ्यांचा, परिसरातील आप्त-मित्रांचा आधार होता. आज उन्मळून पडला. एक “आधारवड” जणू काही कॉलेजच्या सेवेतून निवृत्त झाला.

… प्रदीप देवरुखकर

In

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *