एक दिवस किरण चावरेचा – माझ्या मेव्हण्याचा फोन आला. किरण माथेरानचा. जन्मच तिथला. त्यामुळे कर्मभूमी, मित्रमंडळी, सगेसोयरे आणि सर्वकाही माथेरानच. सर्वांचीच सुख-दुख:, आशा-आकांक्षा, चिंता, एकमेकांशी जुळलेली. माथेरान म्हणजे जणू काही सर्वांचे काळीज. छोटसं, चिमुकलं माथेरान पर्यटकांच्या भेटीवर संसाराचा गाडा ढकलत होतं. जे काही होतं, ते सर्वांचं सारखं होतं. सांस्कृतिक कार्यक्रम होते, खेळ होते, त्यात स्पर्धाही होती. पण मित्रत्वाची. सकोप. राजकारणही होतं आणि राजकारणीही होते. राजकारणात स्पर्धा होती म्हणूनच निवडणुकाही होत्या. निवडणुकीत पराभव होता तसाच विजयही होता. माथ्यावरच्या शीतल, हिरव्यागार रानासारखेच राजकारणीही स्वच्छ आणि माणुसकी जपणारे होते. सुख-दुख: समयी मदतीला धावून जाणारे होते. सर्व काही सुरळीत चालू होते.
आणि एक दिवस …
बातमी आली. उमेशची आई सिरीयस आहे. सर्वत्र कोरोनाचे संकट घोंगावत होते. माथेरानच्या या रानात एकच गोष्ट समाधानकारक नव्हती. अत्यवस्थ रुग्णांसाठी तत्पर वैद्यकीय सेवा अशक्य होती.
या संकटसमयी माथ्यावरच्या रानातला ‘विधाता’ धावत मदतीला आला. सावंतांचा प्रसाद हाती दीर्घायुष्याचा प्रसाद घेऊन उमेशच्या आईसाठी धावला. उमेशची आई व्यवस्थित बरी होऊन परतली. प्रसाद सावंत माथेरानचा नगराध्यक्ष होता हे विशेष.
किरणच्या विनंतीवरून, किरणच्या वतीने प्रसादला शुभेच्छा लिहिल्या …
झाला नियतीचा आघात
घायाळ झाली माता
उमेश चिंताग्रस्त
कोण आता त्राता
रानातला विधाता
मदतीला धावला
जणू किस्ना सर्वांचा
यशोदेला पावला
प्रसाद दिला प्रसादने
ओतला पैसाअडका
दिला हात मदतीचा
नाही पिटला डंका
माथेरानचा भाई तू
द्वारकेला जसा किस्ना
धमकी नाही प्रेम दिलेस
लोभविलेस या मना
Leave a Reply