कट्टा गँग

माझा कट्टा – वय ४० वर्षे.  १९७८ साली काही नाट्यवेड्या तरुणांनी एकत्र येऊन हा कट्टा सुरु केला. यातला एक वेडा मी होतो.  या नाट्यवेड्यांनी स्पर्धेला सादर केलेल्या एकांकिकेचं नाव होतं ‘वेडी’.  खरोखरच एक वेडा प्रकार होता तो.  सगळंच हसं झालं होतं.  मग आम्ही जिद्दीला पेटलो.  पुढील वर्षी अधिक तयारीने त्याच स्पर्धेत भाग घेऊन दुसरा क्रमांक पटकावला.  कट्ट्यावर आणखी काही तरुण मंडळी सामील झाली.  वेगवेगळ्या एकांकिका आणि नाट्य स्पर्धांमध्ये सहभागी झालो.  तेथेही पारितोषिके पटकावली.  तालमीच्या निमित्ताने कट्ट्यावर रोजच इच्छूकांची वर्दळ वाढू लागली.  फक्त एकांकिका आणि नाटके करण्यापेक्षा काही सामाजिक कार्य करता येईल का? याचा विचार सुरु झाला.  कट्ट्याला विस्तृत स्वरूप द्यायचे ठरले.  त्याप्रमाणे कला, ज्ञान, क्रीडा आणि सेवा अशा चार विभागात कार्य सुरु झाले.  लोकसंपर्क वाढला.  कट्ट्यावर सर्वच वयोगटातील लोकांची ये-जा सुरु झाली.  या विभागांतर्फे रंगावली व फोटोग्राफी स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक स्पर्धा, रक्तदान व वैद्यकीय शिबिरे, मुद्रा व त्वचा उपचार केंद्र,  मल्लखांब, क्रिकेट इत्यादींचे आयोजन  केले गेले.  नाट्यशाखेच्या स्पर्धांमधील यशस्वी सहभागाबरोबरच रसिकांसाठी  “टेरेस थियेटर” हा विनामुल्य अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला.  वेगवेगळ्या हाउसिंग सोसायट्यांच्या गच्चीवर एकांकिकांचे प्रयोग करायला सुरुवात केली.  अजूनही सुरु असलेल्या “टेरेस थियेटर” या उपक्रमांतर्गत ३०० पेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत.

नाट्यवेड्या तरुणांनी सुरु केलेला हा कट्टा आता बहरला आहे.  या तरुणांची दुसरी पिढीही कट्ट्यावर कार्यरत झाली आहे.  वरिष्ठ नागरिक झालेले ते नाट्यवेडे तरुण आताही तेवढ्याच जोमाने कार्यरत आहेत.  नव्या पिढीला मार्गदर्शन करीत आहेत.  सध्या कट्ट्याचा संपूर्ण कार्यभार सांभाळणा-या या नव्या पिढीने रोजगार मेळावा, “लेखक एक नाट्यछटा अनेक” ही एकांकिका स्पर्धा, फिल्मिन्गो लघुपट महोत्सव इत्यादी आयोजित करून कट्ट्याचा सामाजिक कार्याचा झेंडा फडकत ठेवला आहे.

या माझ्या कट्ट्याचं नाव आहे ……. प्रयोग मालाड

–  प्रदीप देवरुखकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *