१९७९ साली आम्ही “टेरेस थियेटर” चा पहिला प्रयोग केला. त्याकाळी उपनगरात नाट्यगृहे नव्हती. मराठी प्रेक्षक क्वचितच दादरला रवींद्र नाट्यमंदिर अथवा शिवाजी मंदिरला जात असतं. उपनगरातील प्रेक्षकांना नाटक पहाण्याचा आनंद कसा मिळवून देता येईल? याचा विचार “प्रयोग मालाड” ने केला आणि जन्माला आलं “टेरेस थियेटर”. प्रेक्षक नाट्यगृहाकडे जाऊ शकत नसतील तर नाट्यगृह प्रेक्षकांकडे न्यायचं. सोसायटीच्या गच्चीवर दोन हॅलोजन लाईट लावून कोणत्याही तांत्रिक गोष्टींशिवाय दोन एकांकिकांचा कार्यक्रम पूर्णपणे विनामुल्य करायचा असं ठरलं.
वेगवेगळ्या हौसिंग सोसायटीच्या कमिटीशी संपर्क करायचा. त्यांना “टेरेस थियेटर” ची संकल्पना समजावून सांगायची. स्वत:च जाहिरात करायची. सोसायटीतील सभासदांना निमंत्रण द्यायचं आणि टेरेसवर दोन एकांकिका सादर करायच्या. प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळू लागला.
प्रत्येक शनिवारचा “टेरेस शो” म्हणजे “नवा कट्टा – नवी गँग” असं समीकरण निर्माण झालं. कट्ट्यावर सहज १०० पेक्षा अधिक प्रेक्षक यायचे. कार्यक्रमानंतर कट्ट्यावरील प्रेक्षकांच्या गँगबरोबर स्नेहमेळावा रंगत असे. नाटक पहाण्याच्या आनंदाला वंचित झालेल्या प्रेक्षकांना त्यांच्या घराजवळच नाटक दाखविण्याचा आमचा हेतू साध्य झाला होता.
कालांतराने उपनगरात उभ्या राहिलेल्या नाट्यगृहात प्रेक्षक नाटकाचा निखळ आनंद घेऊ लागले आणि कट्ट्यावरची वर्दळ हळू हळू कमी झाली. पण टी.व्ही ने घात केला. त्याच त्याच रटाळ मालिकात प्रेक्षक हरवून गेले. नाट्यगृहे ओस पडली. “प्रयोग मालाड” ने पुन्हा एकदा डाव सुरु केला – “नवा कट्टा नवी गँग” अर्थात “टेरेस थियेटर”.
दुस-या तिस-या मजल्यावरील टेरेस आता उंच टॉवरवर गेल्या आहेत. काही ठिकाणी कम्युनिटी हॉल झाले आहेत. नवा कट्टा आता उंच टॉवरवरील टेरेसवर किंवा कम्युनिटी हॉल मध्ये बहरतो आहे. आतापर्यंत तीनशेहून अधिक कट्टे आणि गँग “प्रयोग मालाड” ने फुलवल्या आहेत. रसिक प्रेक्षक ९९२०७५९६५९ या फोनवर संपर्क साधतात आणि “प्रयोग मालाड” चे कलाकार नव्या कट्ट्याकडे नव्या गँगला भेटण्यासाठी कूच करतात.
– प्रदीप देवरुखकर
Leave a Reply