थँक्यू आई …

ठाकूरद्वारच्या वळणावरील सरस्वती निवासमधील दोन खोल्यात रहाणारे आमचे एकत्र कुटुंब.  आई-वडील, काका-काकी, आत्या, आजी-आजोबा आणि आम्ही मुलं – एकूण १५ जण.  चाळीतील पहिल्या मजल्यावर एकूण ७ कुटुंबे.  सरस्वती निवासचं वैशिष्ट्य म्हणजे मागे-पुढे असलेली १००-१२० फुट लांब गॅलरी.  आम्ही लहान मुलं दोन्ही गॅलरीत एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत लपंडडाव खेळताना कुणाच्याही घरात लपायचो.  सर्वांचे दरवाजे सताड उघडे असायचे.  मागच्या गॅलरीत प्रत्येकाचे पाण्याचे मोठे पिंप ठेवलेले असायचे.  त्या पिंपाच्यामागेही लपायचो. पण या लांबलचक गॅलरीचा उपयोग माझ्या आईने फारच वेगळ्याप्रकारे केला.

जितेकर वाडीतल्या शाळेत सहावीपर्यंत मराठी माध्यमात माझे शिक्षण झाले.  इंग्रजी एकदम कच्चे.  इंग्रजी शिकवायला काळे गुरुजी होते.  आईला शाळेत बोलावून त्यांनी माझ्या कच्च्या इंग्रजीची तक्रार केली.  विशेषत: इंग्रजी स्पेलिंगमध्ये मी फारच घोळ घालायचो.  एकत्र कुटुंब असल्यामुळे आणि चाळीमध्ये नेहमी गोंधळ असल्यामुळे तिला माझा अभ्यास घ्यायला वेळच मिळत नव्हता.  मग आईने यावर एक मस्त उपाय शोधून काढला.

रात्री घरचे काम संपल्यानंतर तिने मागच्या गॅलरीत माझा इंग्रजी स्पेलिंगचा अभ्यास घ्यायचं ठरवलं.  सर्व चाळकरी रात्री झोपल्यानंतर आई आमच्या खोलीमागच्या दिव्याखाली स्टूल टाकून बसायची.  पुस्तकाचे कोणतेही पान उघडून, त्यातील कोणताही इंग्रजी शब्द सांगून, त्या शब्दाचे स्पेलिंग शब्दाच्या अर्थासह घोकत मागच्या गॅलरीच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत दहा फे-या मारायला सांगायची.  काय आश्चर्य, शब्द त्याच्या स्पेलिंग व अर्थासह सहज पाठ व्हायचा.  इंग्रजी स्पेलिंगचा प्रॉब्लेम कायमचा सुटला.  तेव्हा रात्री गॅलरीत मारलेल्या फे-या आठवल्या की स्वत:शीच हसायला येते.  पण फे-या मारण्याची ती सवय आज खूप उपयोगी पडते.  डोक्यात काही विषय आला की त्याचे संपूर्ण लिखाण होईपर्यंत मी पूर्वीसारखाच फे-या मारत रहातो.  विषय सहजपणे फुलत जातो आणि लिखाण मनासारखे कागदावर उतरते.  आईकडून मिळालेली सुंदर गिफ्ट आहे ही.  थँक्यू आई …

– प्रदीप देवरुखकर

In