चलती का नाम गाडी

सहावीला होतो तेव्हा.  गिरगावातून गोरेगावला शास्त्री नगरमध्ये राहायला आलो होतो.  तुरळक वस्ती आणि रहदारी होती तेव्हा तिथे.  इतर छोटी मुले पायाने ढकलायची स्कूटर रस्त्यावर चालवायचे.  मलाही तशी स्कूटर हवी म्हणून वडिलांकडे हट्ट करायचो.  पण काही कारणांमुळे स्कूटर नाही मिळाली.  मध्यंतरीच्या काळात आईने सायकल चालवायला शिकवले.  पुढे कॉलेजला जायला लागल्यावर मनाने पुन्हा उचल खाल्ली आणि सायकल पाहिजे म्हणून वडिलांच्या मागे लागलो.  यावेळी मात्र वडिलांनी हट्ट पुरवला.  मित्राबरोबर जाऊन BSA कंपनीची रेसर सायकल  विकत घेतली.  अहाहा काय देखण रूप होते ते.  त्या सायकलला फिक्स्ड व्हील होते.  त्यामुळे खूप वेगात चालायची.    रस्त्याने जाताना सर्वजण पहात रहायचे.  मी उगाचच माझी कॉलर ताठ करायचो.  त्या सायकलवरून मी आणि माझे मित्र अलिबाग, कर्नाळा वगैरे ठिकाणी फिरून आलो.  आत्ता सारख्या गिअरवाल्या सायकली तेव्हा नव्हत्या.  पण तरीसुद्धा आम्ही मित्र लांबलांबच्या ठिकाणी घरी ना सांगता फिरायला जायचो.  नोकरीला लागल्यानंतर सुध्दा स्टेशन  आणि घर दरम्यान रोजच फे-या व्हायच्या.  १९७४ ते १९८२ अशी जवळ जवळ ८-९ वर्षे मी ती सायकल चालवली.

पुढे लग्न झाले.  बायकोला स्टेशनवर सोडण्यासाठी Vijay Super ही second hand स्कूटर घेतली.  स्कूटर घेतल्यामुळे वापरात नसलेली BSA कंपनीची सायकल विकावी लागली.  त्यानंतर बजाज कंपनीची चेतक ही नवीन स्कूटर अकरा वर्ष वापरली.  पुढे कायनेटिक चालेंजर, पल्सर, कायनेटिक Y2K, होंडा युनिकॉर्न, यामाहा अशा पाच कंपन्यांच्या दुचाकी चालवल्या.  मध्यंतरीच्या काळात तीन वर्ष Fiat Uno ही चारचाकीही वापरली.

इतिहासाची पुनरावृत्ती होते त्याप्रमाणे व्यायामासाठी पुन्हा एकदा गिअर असलेली सायकल घेतली.  पण शारीरिक दुखण्यामुळे त्याचा वापर थांबवाबा लागला.  आता ती तशीच धूळ खात घराबाहेर पडून असते.  येताजाता सायकलकडे नजर जाते आणि अपराध्यासारखे वाटते.  माझी पहिली “चालती का नाम गाडी” BSA सायकल मात्र स्मरणातून जात नाही.

– प्रदीप देवरुखकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *