देव पावला.
शेवटी एकदाची “देवमाणूस” ही मालिका संपली.
पूर्ण संपली की अर्धवट संपली? माहीत नाही. अर्थात मी कोणतीही टी. व्ही. मालिका पहात नाही. तरी सुध्दा “देवमाणूस” लक्षात राहिली. कारण अख्खा गांव त्या डॉक्टरला “देवमाणूस” म्हणायच्या. पण त्यातील दोन महिला कलाकारांच्या दृष्टीने तो Compounder होता. त्याचा उल्लेख त्या दोघी Compounder म्हणूनच करायच्या. त्याला Compounder अशीच हाक मारायच्या. Compounder या व्यक्तिरेखेबद्दल मला खूप कुतुहुल आहे. माझ्या लहानपणी या Compounder काकांना मी पाहिले आहे. प्रत्येक डॉक्टरांच्या दवाखान्यात एक छोटीशी कॅबिन या Compounder नामक व्यक्तीसाठी हक्काने राखून ठेवलेली असे. समोरच्या बाजूला एक छोटीशी विंडो असे. ही विंडो अशा उंचीवर असे की आतील Compounder काकांशी बोलताना पेशंटला खाली वाकूनच बोलावे लागे. ही विंडो तेवढ्या उंचीवर का असे ते मला कधीच समजले नाही. त्या विंडोतून आत डोकावल्यावर आतील दृश्यही पहाण्यासारखेच. आतील सर्व भिंती औषधांच्या बाटल्यांनी भरलेल्या असत. काही डबेही असत. कसल्याशा पावडरने किंवा गोळ्यांनी तेही भरलेले असत. Compounder काकांच्या समोरच्या टेबलावर मार्बलचा टॉप असे. औषधे सांडल्यामुळे आणि पावडर सर्वत्र पसरल्यामुळे त्या मार्बलचा मूळ रंग ओळखणे कठीण असे. त्या मार्बलवर हात पुसण्यासाठी फडका, एक कात्री, पेन, औषधांची पावडर / गोळ्या भरण्यासाठी पेपरची पाकिटे इत्यादि साहित्य आणि उघड्या ड्रावरमध्ये पेशंटने दिलेले पैसे असत. त्याकाळी डॉक्टरांची फी रुपये १०-१५ च्या आसपास असायची. डॉक्टरांच्या वतीने पेशंटकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी Compounder काकांची असे. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांनी दिलेली चिठी हळूच त्या विंडोतून आत Compounder काकांकडे सरकवायची. डॉक्टरांचे handwriting कसेही असले तरी Compounder काका ते बरोबर वाचायचे. डॉक्टरांनी लिहिल्याप्रमाणे गोळ्या व औषधे किंवा औषधांचे मिश्रण, पाकीट आणि बाटलीत भरेपर्यंत Compounder काका पेशंट बरोबर मित्रत्वाच्या गप्पा मारायचे. त्याकाळी औषधासाठी बाटली बरोबर घेऊन जावी लागे. औषधे घेण्याविषयी Compounder काका सूचनाही द्यायचे. त्यांच्या प्रेमळ सूचना ऐकूनच पेशंट अर्धा बरा व्हायचा.
हळूहळू परिस्थिति बदलली. डॉक्टरांच्या दवाखान्याचं रूप तारांकित बनले. दवाखान्याचे नामांतर Consulting Room असे झाले. पेशंटना बसण्यासाठी असलेली दवाखान्यातील बाकडे जाऊन waiting hall मध्ये पॉश गुबगुबीत खुर्च्या आल्या. Consulting Room वातानुकूलित झाली. तळ मजल्यावरील डॉक्टरांचा दवाखाना आता उंच इमारतीतील वरच्या मजल्यावर Consulting Room मध्ये स्थलांतरित झाला. आपुलकीने औषधांच्या प्रेमळ सूचना देणारे Compounder काका नाहीसे झाले. त्यांच्या जागी मेकअप केलेली नाजुक Receptionist आली. सर्व प्रकारच्या आजारांसाठी एकच फॅमिली डॉक्टर त्याकाळी होता. आता वेगवेगळ्या आजारावरील specialists वेगवेगळ्या Consulting Room मधून पेशंटना treatment देऊ लागले. नाडी परीक्षेवरून आजार ओळखणारे फॅमिली डॉक्टर अंतर्धान पावले आणि pathology reports वरून निदान करणारे specialists जागोजागी उगवले. आजारपण आल्यावर केव्हाही हक्काने डॉक्टरांच्या दवाखान्यात घुसणे आता बंद झाले. “Visit by appointment only” अशा इंग्रजी सूचना Consulting Room मध्ये झळकू लागल्या. वातानुकूलित कॅबिन मध्ये बसलेले डॉक्टर पेशंटला तपासल्यानंतर आकर्षकरीत्या छापलेल्या letterhead वर औषधांचे prescription (हल्ली असेच म्हणतात) प्रिंट करून देऊ लागले. डॉक्टरांची फी सुद्धा रुपये ८०० ते १००० झाली. काही डॉक्टरांची फी रुपये २००० ते ५००० ही असते. गोळ्या आणि औषधे यांचे उत्पादन करण्याचा धंदा Pharmaceutical कंपन्यांनी सुरू केला. जागोजागी उघडलेल्या chemist च्या दुकानातून ही औषधे, गोळ्या आणि इतर वैद्यकीय साहित्य सहज उपलब्ध होऊ लागले. डॉक्टरांची चिठी म्हणजेच prescription या केमिस्टना दाखवले की पाहिजे असलेली औषधे मिळतात. Chemist चं दुकान म्हणजे Compounder काकांच्या छोट्या कॅबिन ऐवजी खूप मोठ्ठ कॅबिन … नव्हे मोठ्ठा हॉल. काकांचे काम हल्ली केमिस्टच करतात. पण आपुलकीने औषधे देणारे Compounder काकांचे हात विसरता येत नाहीत.
— प्रदीप देवरुखकर
Leave a Reply