दिव्यदृष्टी संस्कार सोहळा …

दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १२ वाजून २५ मिनिटांच्या मुहुर्तावर आमच्या मातोश्री श्रीमती उषा प्रभाकर देवरुखकर यांचा दिव्यदृष्टी संस्कार सोहळा यशस्वीपणे संपन्न झाला.

गेले काही महिने दृष्टीक्षीणतेची तक्रार मातोश्री आमच्याकडे करत होत्या. मोत्यांच्या बिंदुंनी आपल्या करामतीची चादर दृष्टीपटलावर अंथरली असेल अशी शक्यताही मातोश्रींनी बोलून दाखवली.

दृष्टीदेवतेच्या मंदीराचे प्रमुख स्वामीजी डाॅ. चिन्मय साहु यांचा सल्ला घेतला. त्यांनीही मोत्यांच्या बिंदुंनी दृष्टीपटलावर अंथरलेली करामतीची चादर आणखी गडद होण्याची शक्यता वर्तवली आणि दृष्टीदेवतेवरील संकटमोचन करण्यासाठी लवकरात लवकर दिव्यदृष्टी संस्कार सोहळा विधीवत संपन्न व्हावा असा सल्ला दिला.

त्याप्रमाणे दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ११ वाजताच दृष्टीदेवतेच्या मंदीराचे प्रमुख स्वामी डाॅ. चिन्मय साहु यांच्या आश्रमात आम्ही मातोश्रींसह प्रवेश केला. स्वामींचे अनेक भक्तगण दिव्यदृष्टी संस्कार सोहळ्यासाठी तिथे जमले होते. ठरलेल्या मुहुर्तावर स्वामी डाॅ. चिन्मय साहु यांनी मातोश्रींना दिव्यदृष्टी संस्कार सोहळ्यासाठी मंदीराच्या गाभार्‍यात पाचारण केले. संस्कार सोहळ्याच्या मार्गक्रमणेत स्वामींचे सहाध्यायी, स्वामी डाॅ. केतन शहा यांच्या दिव्य शक्तीमुळे आमच्या मातोश्रींनी कळाहिन जगताची सैरही केली. ही सैर करताना दिव्यदृष्टी संस्कार सोहळ्याचा प्रारंभ कधी झाला आणि सोहळ्यातील परमोच्च क्षण कधी संपन्न झाला हेही मातोश्रींना कळले नाही.

संस्कार सोहळा विधीवत संपन्न झाल्यावर, दृष्टीदेवतेला ‘Pred Forte, Kitmox, Eyemist इत्यादी दिव्य बिंदुंचा अखंड अभिषेक सप्ताह सुरु ठेवण्याचा सल्ला प्रमुख स्वामी डाॅ. चिन्मय साहु यांनी दिला आहे. तसेच ‘Tab Emanzen’ च्या प्रसादाचे भक्षण करण्याचे सुचविले आहे. दिव्यदृष्टी संस्कार सोहळा यशस्वीपणे संपन्न झाल्यानंतर आमच्या मातोश्रींनी त्याचदिवशी प्रसन्नतेने सायंकाळी ४.०० वाजता माघारी परतून गृहप्रवेश केला.

या दिव्यदृष्टी संस्कार सोहळ्याला “New India Assurace Company” या हितचिंतकाचा अर्थपूर्ण आशिर्वाद लाभल्यामुळे एकुणच सोहळा आगळावेगळा ठरला.

अशारितीने दिव्यदृष्टी संस्कार सोहळ्याचा पुर्वार्ध यशस्वीपणे पार पडला. या सोहळ्याचा उत्तरार्ध २-३ महिन्यानंतर संपन्न करावा तरच मोत्यांच्या बिंदुंच्या करामतीची चादर दृष्टीपटलावरुन नष्ट होईल आणि दृष्टीदेवता प्रसन्न होऊन सारी दुनिया स्वच्छ व सुंदर दिसेल असा सल्ला प्रमुख स्वामी डाॅ. चिन्मय साहु यांनी दिला आहे.

आजच्या कलियुगात या दिव्यदृष्टी संस्कार सोहळ्याला Cataract Operation असेही म्हणतात.

… प्रदीप देवरुखकर

In

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *