लाला लजपतराय महाविद्यालयातून सेवानिवृत्त होऊन आता तीन वर्ष होतील. १९८२ ते २०१५ – तेहतीस वर्षांची सहका-यांची साथसंगत. एकत्र काम करताना, एकमेकाच्या सुखदु:खात सहभागी होताना वर्षे कशी सरली ते कळलंच नाही. हळूहळू एक एक जण सेवानिवृत्त होत गेला. सेवानिवृत्तीच्या दिवशी स्तुतीपर भाषणे व्हायची आणि “निरोप समारंभ” संपायचा. मी अस्वस्थ व्हायचो. महाविद्यालयाच्या सेवेत अर्धे आयुष्य व्यतीत केलेल्याला “निरोप” का द्यायचा? समारंभाला “निरोप समारंभ” का म्हणायचं? त्याऐवजी “कृतज्ञता दिन” साजरा झाला पाहिजे. निवृत्त होणा-या व्यक्तीप्रती “कृतज्ञता” व्यक्त व्हायला हवी.
मग मी ठरवलं, सेवानिवृत्त होणा-या सहका-याला “कृतज्ञता” म्हणून “मानपत्र” द्यायचं. बाकीचे सहकारीही तयार झाले.
श्री. विश्वनाथ शिंदे, सर्वात कनिष्ठ पदावरून सर्वोच्च पदापर्यंत पदोन्नती मिळवीत “रजिस्ट्रार” म्हणून सेवानिवृत्त झाले. “रजिस्ट्रार” म्हणजे “प्रबंधक“. त्यांना “प्रबंधकाचा प्रबंध” हे मानपत्र आम्ही दिले. त्यांची या महाविद्यालयातील सेवा म्हणजे नियतीने त्यांच्यासाठी लिहिलेला “प्रबंध” अशा अर्थाचे हे मानपत्र होते.
प्रत्येक कामात “अमूल्य” ठसा उमटवित श्री. हमीद मुल्ला सेवानिवृत्त झाले. त्यांना “अमूल्य मुल्ला” असे मानपत्र आम्ही दिले.
श्री. जगन्नाथ शर्मा म्हणजे अन्नपूर्णाच. आमच्यासाठी चमचमीत पदार्थ घरून बनवून आणायचे. “जगन्नाथ – पुरीचा – शर्मा” असे मानपत्र देऊन आम्ही त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्ती केली.
श्रीमती हरिणी मॅडमचा “कृतज्ञता दिन” सर्वार्थाने “विशेष” ठरला. मानपत्राबरोबरच त्यांच्यावर आम्ही एक “शॉर्ट फिल्म” बनवली. त्यांच्या सेवाकाळात आम्ही अनुभवलेली “त्यांची” वेगवेगळी रूपे आम्ही त्यात चित्रित केली होती.
श्री. वासुदेव गावडे ३६ वर्षाची सेवेनंतर निवृत्त झाले. महाविद्यालयाच्या प्रत्येक विभागात (नाक्यावर) त्यांनी काम केले. म्हणून आम्ही त्यांना “वासूनाका” (वासूचा नाका) अशा अर्थाचे मानपत्र दिले.
२८ फेब्रुवारी २०१५ ला मी सेवानिवृत्त झालो. माझ्या निवृत्तीदिनी मीच सर्वांप्रती “कृतज्ञता” व्यक्त करताना म्हणालो …
जीवन येथील आनंदमय, पण संपले आता
नमस्कार करतो गुरुजनाहो, सोडूनी जाता जाता
– प्रदीप देवरुखकर
Leave a Reply