माझी मधुर सोसायटी… १९७५ ला मी मालाड पश्चिमेच्या मधुर सोसायटी रहायला आलो. चिंचवली बंदर रोडवरील मधुर सोसायटीचा परिसर त्याकाळी जंगलासारखाच होता. मोजक्याच ३-४ मजल्याच्या इमारती आणि तेथील मुळच्या रहिवाश्यांच्या बैठ्या चाळी. आजूबाजूला शेताड जमिनी आणि त्यामधून जाणारा चिंचोळा चिंचवली बंदर रोड. सूर्यास्तानंतर या रोडवरून घरी जायचं म्हणजे पोटात गोळा यायचा. आत्ताचा लिंक रोड अस्तित्वातच नव्हता त्यावेळी. त्याठिकाणी चिंचोली बंदर रोडच्या शेवटी खाडी होती.
आता हा परिसर ओळखु न येण्याइतका बदललाय. सर्वत्र उंच-उंच सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. मधुर सोसायटीमधेही अमुलाग्र बदल झालाय. सोसायटीची दुसरी पिढी आता क्रियाशील झालीय. मधुरच्या संस्थापक सदस्यांची शतकाकडे वाटचाल सुरु आहे. सोसायटीनेही अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्यानिमित्ताने २५ मार्च २०१८ ला सुवर्ण महोत्सवी जल्लोष साजरा करण्यात आला. मधुरच्या संस्थापक सदस्यांना मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या माझ्या मधुर सोसायटीला मीही मुजरा केला …
माझ्या सोसायटीची, ऐका ही कहाणी
“मधुर” नाम तिचे, मधुर तिच्या आठवणी
भेट झाली अनोळख्यांची, जमला एक समूह
सरकारी कर्मचा-यांचे, जूळले आरोह-अवरोह
आरोहण केले त्यांनी, अगणित अडचणींवर
उभी केली सोसायटी, चिंचवलीच्या वळचणीवर
नाम ठेविले “मधुर”, कामही केले मधुर
कीर्ती पसरली “मधुर” ची, दूर सर्वदूर
ए, बी, सी, डी, इ बिल्डींग, जणू पाच पांडव
दुर्योधनही आहे एक, करितो नेहेमी तांडव
आज आत्ता समोर आहेत, सोसायटीचे मूळपुरुष
खरोखर यांच्याचमुळे आज, आमची पिढी आहे खूष
यांच्याचमुळेच आज, होतोय सुवर्णमहोत्सव साजरा
सोसायटीच्या आजच्या पिढीचा, यांना मानाचा मुजरा
Leave a Reply