माझी लाल परी

लग्न झाल्यावर बायकोला रोज पहाटे ५.३० वाजता स्टेशनवर सोडण्यासाठी सेकंड हँड स्कूटर घेतली. पण वारंवार नादुरुस्त व्हायची.  त्यावेळी नवीन स्कूटरसाठी वेटिंगलिस्ट असायची.  ओळखीने २-३ महिन्यात मिळेल पण मिळेल तो रंग घ्यायला लागेल असं मित्राने सांगितले.  आणि मी नवी कोरी ऑफ व्हाईट रंगाची स्कूटर घेऊन घरी आलो. ती स्कूटर ११ वर्षे वापरली.  त्यानंतर ५-६ बाईक घेतल्या पण सगळ्याच सेकंड हँड होत्या.  मुलासाठी वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून नवीन बाईक घ्यायचं ठरलं. वाढदिवशीच गाडी आणायची या हट्टापाई मिळेल त्या रंगाची आणि स्टाईलची बाईक आणली.  आम्ही दोघेही ती चालवायचो.  पण ती सेल्फ स्टार्टवाली नव्हती.  म्हणून दोघांसाठी वेगवेगळी सेल्फ स्टार्टवाली नवीन बाईक घ्यायचं ठरवलं. मुलाने त्याला आवडलेली काळ्या रंगाची स्टाईलीस्ट बाईक घेतली.  पत्नीने माझ्या बाईकसाठी लाल रंग निवडला. लाल रंगाची ती नवी कोरी बाईक जणू काही माझी लाल परी होऊन घरी आली.  माझ्या या लाल परीचे हार घालून सर्वांनी  आनंदाने स्वागत केले.  मी मात्र भूतकाळात गेलो होतो.

३-४ वर्षाचा असेन मी.  गिरगावातील सरस्वती निवासमध्ये पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीत आजीच्या मांडीवर बसून रस्त्यावरून जाणा-या येणा-या गाड्या पाहून मला आनंद व्हायचा.  दुमजली बस गेली की मी आजीला ओरडून सांगायचो – आजी ती बघ केव्हढी मोठ्ठी गाडी गेली.  आजीसुध्दा माझ्याबरोबर लहान होऊन गप्पा मारायची. म्हणायची – तू सुध्दा अशीच मोठ्ठी गाडी घे.  मी तिला अजाणतेपणी सांगायचो – हो मी अशीच लाल रंगाची मोठ्ठी गाडी घेणार आणि तुला खूप फिरवून आणणार.

लाल परी घरी आल्यावर बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.  आजी तर आता नाही.  पण रोज ही लाल परी सुरु करताना आजीची आठवण येते आणि मनातल्या मनात हसतच आजीला म्हणतो – चल बस मागे, तुला फिरवून आणतो.

 

In

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *