माझी ट्रीप – मुंबई ते रत्नागिरी

रत्नागिरीहून शिरीषने त्याच्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी फोन केला.  शिरीष आमचा शाळेतला मित्र. अभ्युदयनगरमधील शिवाजी विद्यालयाच्या १९७२च्या बॅचचे आम्ही विद्यार्थी.  अकरावी नंतर चाळीस वर्षे आम्ही दहाजण फोनवरून एकमेकांच्या संपर्कात आहोत.  या लग्नाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येण्याची संधी होती.  मी पटापट सर्वांना फोन करून चार दिवस मोकळे ठेवण्यासाठी विनंतीवजा धमकी दिली.  लग्नाला अजून १५ दिवस होते.  शाळेतल्या पिकनिकसारखा उत्साह सर्वांमध्ये संचारला होता.  कारण शाळा संपल्यानंतर प्रथमच आम्ही एकत्र प्रवास करणार होतो.  आणि तो दिवस उजाडला.

पहाटे साडेपाचलाच गाडीतून मी आणि रवी सावंत निघालो.   वाटेत श्रीकांत गोखले, अनंत कदम, नरेंद्र गावडे, एकनाथ राणे, सत्यवान आंबेरकर आणि रवींद्र मोंडकर यांना घेतले आणि लग्नाआधीच आम्हा शाळकरी मित्रांची वरात निघाली.  सर्वच साठीच्या आसपास.  एकमेकांची भंकस करत इतर मित्रांची आठवण काढत प्रवास सुरु होता.  हळूहळू प्रत्येकजण निद्राराणीच्या कुशीत शिरला.  आणि गाडीत शांतता पसरली.   दुपारी एकच्या सुमारास पोटातल्या कावळ्यांनी सर्वांनाच उठवले.  हॉटेल शोधता शोधता एक ‘झोपडी’ मिळाली. ‘झोपडी’ म्हणजे एक साधेच हॉटेल होते.  पण खाण्यापिण्याची उत्कृष्ठ व्यवस्था होती.   आरामात जेवून पुढच्या प्रवासाला लागलो.  संध्याकाळी सात वाजता लग्नघरी पोचलो आणि आश्चर्याचा धक्का बसला.  आमचा आणखी एक शाळकरी मित्र शशिकांत लाड तिथे आमची वाट पहात होता.  लग्नघरी शिरीषने रहाण्याची खूपच चांगली व्यवस्था केली होती.  रात्रीच्या जेवणानंतर उशिरापर्यंत रत्नागिरीच्या रस्त्यावर वेड्यासारखे भटकत होतो.  झोपायला खोलीवर आलो तरी न झोपता अंथरुणावर पडल्यापडल्या भंकस चालूच होती.

सकाळी नवदांपत्याला आशीर्वाद देऊन परतीच्या प्रवासाला लागलो.  गणपतीपुळ्याच्या गणेशाचे दर्शन घेऊन, तिथल्या समुद्रकिना-यावर मनमुराद भटकलो.  लाडच्या ओळखीने रहायला बंगला मिळाला.  रात्री पुन्हा शाळेसारखी धमाल केली.  सकाळी निघालो आणि पुन्हा मुंबईत मिसळलो.  या लग्नाच्या निमित्ताने आम्ही सारेच रिचार्ज झालो होतो.

– प्रदीप देवरुखकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *