मनोहर तायशेटे …

मनोहर तायशेटे…   सारे जग “उदय” म्हणून ओळखते.. वय वर्षे ६० पूर्ण…  पण उंची फक्त ५ फुट… अवखळपणाही उंची इतकाच.. पण कर्तबगारी वयाएवढी.. थोडीशी जास्तीच.

तर अशा आमच्या इवल्याशा “उदू” चा षष्ठ्याब्दीपूर्ती सोहळा संपन्न झाला उंचच उंच खंडाळ्याच्या डोंगरावर. सगेसोयरे, मित्रमंडळी, कुटुंबीय सारेच जमले होते इवल्याशा “उदू” ला डोंगराएवढ्या शुभेच्छा द्यायला.  मग मीही दिल्या शुभेच्छा … अशा –

तो आहेच तसा….
इवलासा
सर्वांना हवाहवासा…….

मस्त ती बटू मूर्ती
उत्साहाला त्याच्या नेहमीच भरती
जनसेवेचा घेतलाय वसा
कारण
तो आहेच तसा….
इवलासा
सर्वांना हवाहवासा…….

बाळगोपाळांचा मित्र तो
मित्र मैत्रिणींचा गोपी तो
मित्रावळ्यातला ‘मोरावळा’ जसा
कारण
तो आहेच तसा….
इवलासा
सर्वांना हवाहवासा…….

युनियनचा अध्यक्ष तो
प्रत्येकाचा मित्र तो
प्रत्येकाच्या मनात त्याचाच ठसा
कारण
तो आहेच तसा….
इवलासा
सर्वांना हवाहवासा…….

डोंगरद-यातील मुशाफिर तो
मुशाफिरीतला ‘माहीर’ तो
कडेकपारींचा हा लाडका ससा
कारण
तो आहेच तसा….
इवलासा
सर्वांना हवाहवासा…….

प्रयोगचा आधारस्तंभ तो
उत्साहाचा आरंभ तो
प्रयोगच्या डोला-याचा हाच मुख्य वासा
कारण
तो आहेच तसा….
इवलासा
सर्वांना हवाहवासा…….

टीव्हीवर ‘घर’ बांधितो
स्टेजवरही सुखाने नांदतो
चित्रपट निर्मितीची आहे लालसा
कारण
तो आहेच तसा….
इवलासा
सर्वांना हवाहवासा…….

स्नेहाचा स्नेहबंध तो
श्वेता-ईशाचा जीवनानंद तो
नुपुरचा सूर तो
ओंकार-शार्दुलचा श्वसुर तो
सर्वांसाठी त्याचा जीव वेडापिसा
कारण
तो आहेच तसा….
इवलासा
सर्वांना हवाहवासा…….

बाळगोपाळांचा मित्र तो
मित्र मैत्रिणींचा गोपी तो
युनियनचा अध्यक्ष तो
प्रत्येकाचा मित्र तो
डोंगरद-यातील मुशाफिर तो
मुशाफिरीतला ‘माहीर’ तो
प्रयोगचा आधारस्तंभ तो
उत्साहाचा आरंभ तो
टीव्हीवर हा ‘घर’ही बांधितो
स्टेजवरही सुखाने नांदतो
पण असे असले तरी ………..

आमचा मात्र ‘उदु’च तो

साठी उलटलीय साल्या ….
आता तरी नीट वाग.

साठी गाठलेल्या या बालकाला कोटी कोटी शुभेच्छा

– प्रदीप देवरुखकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *