माझी जागा – लाला लजपतराय महाविद्यालय. माझे अर्धे आयुष्य याच ठिकाणी मी व्यतीत केले. येथे नोकरीला लागल्यामुळेच माझ्या आयुष्याचा मार्ग सुकर झाला. खर तर शाळा, महाविद्यालये म्हणजे ज्ञानमंदिरेच. आयुष्यातील सर्व महत्वाच्या अंगांचे शिक्षण मी याच ज्ञानमंदिरात मिळवता येते.
माझ्या प्रत्येक शिक्षक / शिक्षकेतर सहका-याने अप्रत्यक्षपणे माझ्या गुरुचीच भूमिका येथे पार पाडली. माझ्या येथील सर्व गुरूंनी अगदी मुक्त हस्ते माझ्यावर ज्ञानकण उधळले.
येथील सर्व सजीव माणसेच नव्हे तर लाला लजपत राय महाविद्यालयाची ही इमारत आणि सभोवतालची भौगालिक परिस्थिती सुद्धा माझे गुरु बनले. स्वातंत्र्य सेनानीच्या नावाने पावन झालेल्या या इमारतीने अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मला दिली. या इमारतीच्या बाजूला असलेल्या रेसकोर्सने, आयुष्यात वेग असावा, ध्येय असावे, याचीच शिकवण दिली. समोर पसरलेल्या अथांग सागराने, आयुष्यात संकटाच्या कितीही उंच लाटा उसळल्या तरी हाजीअलीच्या दर्ग्यासारखे निश्चल रहा, कणखर रहा अशीच शिकवण दिली. महालक्ष्मीचा आशीर्वाद सतत माझ्या पाठीशी होता. आणि जवळच असलेल्या सरकारी अधिका-यांच्या वसाहतीने, आयुष्यात उत्तम प्रशासन आवश्यक आहे असाच मंत्र शिकविला.
या सर्व सजीव, निर्जीव गुरूंनी या ज्ञानमंदिरात माझ्यावर संस्कार केले. मला अनुभव संपन्न केले. येथील कारकीर्दीत मिळालेला गुरुमंत्र म्हणजे माझ्या आयुष्यातील संस्मरणीय ठेवा आहे. आणि म्हणूनच निवृत्तीदिनी माझ्याकडून पुढील शब्द नकळत बोलले गेले ………
या ज्ञान मंदिरातील, मी एक विद्यार्थी
आलीय मला इथे, दिव्यत्वाची प्रचीती ||
एकलव्याचे दुख:, मी न इथे सोसले
माझ्याही नकळत, मला गुरु इथे लाभले ||
सजीव माणसेच नाही, तर निर्जीवही
झाले माझे गुरु, समृद्ध माझ्या आयुष्याची वही ||
याच ज्ञान मंदिरात मिळाला, अमूल्य गुरुमंत्र
इथेच शिकलो मी, यशस्वी आयुष्याचे तंत्र ||
कृतज्ञ मी, कृतार्थ मी, या ज्ञानमंदिरातील विद्यार्थी
हीच ती जागा, जेथे कर माझे जुळती ||
– प्रदीप देवरुखकर
Leave a Reply