निरोप समारंभ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. पहिला शाळेतून बाहेर पडताना, दुसरा निवृत्तीचा आणि तिसरा व शेवटचा – तो पहाता येत नाही, अनुभवता येत नाही.
आयुष्यातला पहिला निरोप समारंभ … शाळेच्या निरोप समारंभाला म्हटलेली स्वरचित कविता …
राहीलो गेली अकरा वर्षे आनंदाने जेथे |
शिकलो, खेळलो, बागडलो आनंदाने तेथे ||
प्रवेश केला पहिलीमध्ये जेव्हा होतो अज्ञान |
बाहेर पडतोय आता होऊनी मी सज्ञान ||
पण बनलो नाही मी सज्ञान आपोआप |
घेतले त्यासाठी शिक्षकांनी श्रम खूप ||
अनेक वेळा दंगा केला मारले शिक्षकांनी जेव्हा |
उलटूनी बोललो चटकन रागावूनी तेव्हा ||
पण मारले त्यांनी तेव्हा चांगल्या करिता माझ्या |
माफी मागतो त्यांची निरोप प्रसंगी या ||
जीवन येथील आनंदमय पण संपले आता |
नमस्कार करतो गुरुजनहो सोडूनी जाता जाता ||
आयुष्यातला दुसरा निरोप समारंभ .. लाला लजपत राय कॉलेजमधून माझी सेवानिवृत्ती – २८ फेब्रुवारी २०१५.
खरं तर शाळा, महाविद्यालये म्हणजे ज्ञानमंदिरेच.
येथील सर्व सजीव माणसेच नव्हे तर लाला लजपत राय महाविद्यालयाची ही इमारत आणि सभोवतालची भौगालिक परिस्थिती सुद्धा माझे गुरु बनले. स्वातंत्र्य सेनानीच्या नावाने पावन झालेल्या या इमारतीने अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मला दिली आणि म्हणूनच माझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध न्यायालयात ३० वर्षे मी लढा दिला व विजयी झालो. या इमारतीच्या एका बाजूला रेसकोर्स आहे. आयुष्यात वेग असावा. एक ध्येय असावे. याचीच शिकवण देते. समोर पसरलेला अथांग सागर. आयुष्यात संकटाच्या कितीही उंच लाटा उसळल्या तरी हाजीअलीच्या दर्ग्यासारखे निश्चल रहा, कणखर रहा अशीच शिकवण देतो. महालक्ष्मीचा आशीर्वाद तर सततच आपल्या मिळतोय. जवळच असलेली सरकारी अधिका-यांची वसाहत, आयुष्यात उत्तम प्रशासन आवश्यक आहे असाच मंत्र देते.
माझ्या प्रत्येक सहका-याने अप्रत्यक्षपणे माझ्या गुरुचीच भूमिका पार पाडली. माझ्या येथील सर्व गुरूंनी अगदी मुक्त हस्ते माझ्यावर ज्ञानकण उधळले. या सर्व सजीव निर्जीव गुरूंनी या ज्ञानमंदिरात माझ्यावर संस्कार केले. मला अनुभव संपन्न केले. या सर्व गुरूंचा मी ऋणी आहे. येथील कारकीर्दीतीत मिळालेला गुरुमंत्र म्हणजे माझ्या आयुष्यातील संस्मरणीय ठेवा आहे.
या ज्ञान मंदिरातील, मी एक विद्यार्थी |
आली मला इथे, दिव्यत्वाची प्रचीती ||
एकलव्याचे दुख:, मी न इथे सोसले |
माझ्याही नकळत, मला गुरु इथे लाभले ||
सजीव माणसेच नाही, तर निर्जीवही |
झाले माझे गुरु, समृद्ध माझ्या आयुष्याची वही ||
याच ज्ञान मंदिरात, मिळाला अमूल्य गुरुमंत्र |
इथेच शिकलो मी, यशस्वी आयुष्याचे तंत्र ||
निवृत्तीच्या उंबरठ्यावर, कृतज्ञ मी, कृतार्थ मी |
फेडू कसे तुमचे उपकार? कन्फ्युज झालोय मी.||
तिसरा आणि शेवटचा निरोप समारंभ … कधी?
– प्रदीप देवरुखकर
Leave a Reply