पराग बोरसे … एक व्रतस्थ मुसाफीर …

पराग बोरसे …

एक व्रतस्थ मुसाफीर … कलेच्या प्रांतात मुक्त विहार करणारा एक स्वच्छंदी … रंगांच्या आसमंतात यथेच्छ बुडून रंगणारा रंगकर्मी … कर्जतजवळील हिरव्याकंच गावात मनोसक्त भटकणारा निसर्गवेडा … निसर्गाने रंगवलेल्या असंख्य चित्रात भान हरपून रमणारा एक वेडा चित्रकार …

या सगळ्या निसर्गचित्रातून आणि या निसर्गचित्रातील ग्रामीण जग पाहून ज्याच्या जाणिवा जागृत होतात असा हा अवलिया जेव्हा ब्रश हाती घेतो तेव्हा निसर्गही त्याला शरण जातो आणि मुकाट परागच्या कॅनव्हासमधे स्थानापन्न होतो. गावागावातील जिवंत प्राणीमात्र कॅनव्हासमधील निसर्गापाठोपाठ परागच्या ब्रशच्या प्रत्येक स्ट्रोकचा रस्ता धरुन स्वत:हून कॅनव्हासमधे विलीन होतात.

लहानग्या परागने बनवलेला मातीचा गणपती मी पाहीला आहे. अभिमानाने त्याने मला दाखवला. पण अभिमानापेक्षा त्याचा आत्मविश्वास मला अधिक भावला. त्या गणरायानेही त्याला आशिर्वाद दिला … यशस्वी भवं … आणि परागने कलेच्या या दैवताचा आशिर्वाद खरा ठरवला.

परागने चित्रकलेचे व्रत घेतले. क्षणाक्षणाला फक्त आणि फक्त चित्रकलेचेच ध्यान. … चित्रकलेचाच ध्यास … चित्रकला हाच त्याचा श्वास. चित्रकलेचेच ध्यान, ध्यास आणि श्वास पांघरुन ध्यानस्थ बसलेल्या परागला पहाणे हा एक अलौकीक आनंद आहे. भान हरपून चित्रकलेची तपश्चर्या करणा-या, प्रत्येक क्षणी चित्रकलेचेच ध्यान करणा-या परागला त्या गणरायाने म्हणूनच एक अतिशय सुंदर आशिर्वाद दिलाय … “ध्याना” च्या रुपाने.

आता परागचा ध्यास एकच … ध्यान एकच … आणि श्वासही एकच … ध्याना … ध्याना … ध्याना … ध्याना … ध्याना …

– प्रदीप देवरुखकर

In

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *