श्रवणकुमार अभी भी है…

सकाळीच जवळच्या नातेवाईकाचा फोन आला.  भाई, अरे राणीताई गेली.  मी म्हटलं येतो.  वयोवृध्द काका आणि काकीना घेऊन कांदिवलीला जाईपर्यंत साडेअकरा वाजले.  काका-काकी – वय वर्षे ७५ च्या आसपास.   तिथे गेल्यावर सर्व व्यवस्था करेपर्यंत दुपारचा एक वाजला.  तोपर्यंत काकांकडे लक्षच गेलं नाही.  बिचारे एकटेच त्या बिल्डींगच्या खाली खुर्चीवर बसून होते.  सकाळपासून त्यांनी काहीच खाल्ले नव्हते.  त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन यावे या विचारांनी मी बाहेर पडलो.  इतर नातेवाईक यायला अजून वेळ होता.  आसपासच्या परिसरात फास्टफुड्शिवाय काहीच नव्हतं.  शेवटी एका ठिकाणी मिसळ मिळाली.  मिसळीच पार्सल घेऊन परत त्या बिल्डींगमध्ये आलो.  काका खालीच बसले होते.  मिसळीच पार्सल उघडून एका प्लेटमध्ये कांदा, फरसाण, रस्सा आणि बटाट्याची भाजी एकत्र करून मिसळ तयार केली आणि काकांना मिसळ पाव दिला.  बाजूला पाण्याची बाटली ठेवली.  भूक लागल्यामुळे मिसळ खाताना काकांचे इथेतिथे लक्ष नव्हते.  दुरून त्या बिल्डींगचा वृध्द वॉचमन हे सगळं पहात होता.  ७० च्या आसपास नक्कीच असेल वय त्याचं.  तो वॉचमन जवळ आला.  जवळ येऊन काहीच न बोलता तसाच आमच्या बाजूला काहीवेळ उभा राहिला.

नंतर म्हणाला …. “श्रवणकुमार अभी भी है. कबसे देख रहा हुँ, आप बडी प्यारसे पिताजी को खान खिला रहे हो.  आजकाल ऐसे बेटे कहाँ मिलते है.  श्रवणकुमार अभी भी है” ….

श्रवणकुमार अभी भी है? …  मला काहीच कळले नाही.  मी उगाचच त्याची चौकशी करायला सुरवात केली.  तो बिहारहून आला होता.  एकटाच रहात होता मुंबईत.  मी त्याला विचारले “फॅमिली कहाँ है?”  त्याची फॅमिली बिहारला होती.  एक मुलगा बायकोमुलांसह मुंबईतच रहात होता.  पण बापाशी त्याने काहीच संबंध ठेवले नव्हते.  हा बिचारा वॉचमनगिरी करून स्वत:चे पोट भरत होता.  तो पुन्हा काहीही न बोलता तसाच बाजूला उभा राहिला.  काकांची मिसळ खाऊन झाल्यावर मी कचरा टाकायला बिल्डींगच्या मागे गेलो.

पण डोक्यातून त्या वॉचमनचं ते वाक्य जात नव्हतं.    कोण श्रवणकुमार?  आणि त्याच्याबद्दल हा वॉचमन मला का सांगतोय?  काही समजत नव्हतं.  त्याला विचारण्यात काहीच अर्थ नव्हता.  इतर नातेवाईक मंडळी जमा झाली होती.  अॅब्यूलन्सही आली होती.  स्मशानयात्रा सुरु झाली.  स्मशानातील सर्व विधी आटपून घरी परतत होतो आणि….

अचानक डोक्यातील प्रश्नाचा – वॉचमनच्या त्या वाक्याचा उलगडा झाला.  श्रवणकुमार म्हणजे श्रावणबाळ.  वृध्द आईबापाला खांद्यावरील कावडीत बसवून तीर्थयात्रेला नेणारा पुराणातील श्रावणबाळ.  काकांना मिसळ देताना दुरून पाहणारा तो वॉचमन मला आठवला.  त्यावेळी काहीही न बोलता तसाच बाजूला उभा राहिलेला तो वॉचमन कदाचित आपल्या मुलाला आठवत असेल की मुलाशिवाय जगण्याच्या आपल्या दुर्भाग्याला हसत असेल की काकांना मिसळ देताना पाहून त्याने मलाच श्रवणकुमार मानलं असेल.

काहीच कळत नाहीय … ती त्याची अगतिकता की वेदना?

– प्रदीप देवरुखकर

In

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *