थँक्यू, लाला लजपत राय कॉलेज

सन १९७७. नोकरी शोधायला सुरुवात केली. शैक्षणिक पात्रता जेमतेमच होती.  त्यामध्ये सुधारणा करण्याची इच्छाही होत नव्हती.  एकच कला उत्तमपणे अवगत होती.  ती म्हणजे टंकलेखन.  शेवटी सन १९८२ ला लाला लजपत राय महाविद्यालयात टंकलेखक म्हणून नोकरी मिळाली.  १९८४ ला तेथे नवीन कॉम्प्युटर घेण्यात आला. महाविद्यालयातर्फे मला एका आठवड्याच्या कॉम्प्युटर प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले.  आणि तेच माझ्या आयुष्यातील वैशिष्ट्यपूर्ण वळण ठरले. संगणकाच्या अदभूत करामतींनी मी अक्षरश: भारावून गेलो.

महाविद्यालयाच्या वाचनालयात असलेली कॉम्प्युटरची असंख्य पुस्तके मी झपाटल्यासारखी वाचायला सुरुवात केली.  महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सुध्दा मला प्रोत्साहन दिले.  त्यामुळे कामाची वेळ संपल्यावर उशिरापर्यंत मी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटरवर स्वत:च वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू लागलो.  सन १९८५-८६ चा तो काळ.  त्या काळात मिळणा-या पगाराच्या तुलनेत कॉम्प्युटर प्रशिक्षणासाठी लागणारी फी खूपच म्हणजे माझ्या पगाराच्या तिप्पट होती.  त्यामुळे एखाद्या कॉम्प्युटर इंस्टीटयूटमध्ये शिक्षण घेणे शक्यच नव्हते. मग एकलव्यासारखा मीच माझा गुरु बनलो.  महाविद्यालयाच्या व्यवस्थापनानेही कॉम्प्युटर प्रशिक्षणासाठी लागणारी फी मला दिली. हळूहळू ऑपरेटींग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, डेटाबेस, स्प्रेडशीट म्हणजे काय याचा उलगडा झाला.  कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचे ज्ञानही मिळविले.  महाविद्यालयाचे जास्तीत जास्त काम कॉम्प्युटरवर करण्याचे प्रयत्न सुरु केले आणि ते यशस्वीही झाले.  अर्थातच या मागची प्रेरणा प्राचार्यांची होती.  माझ्या या वेडामुळे सहकारी मला टाळू लागले.  पण मी बनविलेल्या कॉम्प्युटर प्रोग्राममुळे त्यांचे काम सोपे आणि जलद झाले याचे मानसिक समाधान मला लाभलय.

जेमतेम शैक्षणिक पात्रता असलेला व कोणतीही पदवी नसलेला मी, आज कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून ओळखला जातो.  मित्र, सहकारी आणि इतरही अनेकजण कॉम्प्युटर विषयक सल्ल्यासाठी माझाकडे येतात. तेव्हा सहाजिकच मनातल्या मनात मी कॉम्प्युटरला व माझ्या महाविद्यालयाला एक सॅल्युट मारतो. कारण या दोघांमुळेच निवृत्तीनंतरही मी आज “कॉम्प्युटर मॅन” म्हणून ओळखला जातो.

– प्रदीप देवरुखकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *